घोडगंगा सुरु करुन दाखवणारच : पवार
शरद पवारांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी
शिरुरच्या शेतकऱ्यांनो " घोडगंगा सहकारी साखर कारखाना मी सुरू करुन दाखवणारच " हा माझा तुम्हाला शब्द आहे,
मी शब्दाचा पक्का आहे.त्याबद्दल कसलीही शंका मनात ठेवू नका.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
वडगाव रासाई (ता.शिरूर - कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)
वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी शिरूरसह हवेलीतील नागरिकांनी सभेला मोठया प्रमाणात अभूतपूर्व गर्दी केली होती.त्यामुळे वडगाव- मांडवगण फराटा रस्त्यावर दोन्ही बाजुला पाच किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पवार म्हणाले की,वाढते नागरीकरण व काही इतर घटनांमुळे यशवंत साखर कारखाना बंद पडला.परंतु शिरूरचा घोडगंगा चांगला चालू होता.गळीत हंगाम सुरू करण्यासाठी एनसीडीसी कडून मंजूर झालेले कर्ज या शिंदे सरकारने अडवले.याबाबत मी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून विचारणा केली मात्र माझी अडचण आहे समजून घ्या असे ते म्हणाले.म्हणजे यांना कोण दम देते हे आता माझ्या लक्षात आले आहे.सत्ता ही अडवणूक करण्यासाठी नसते.
परंतु घोडगंगा कारखान्या संदर्भात केंद्राच्या एनसीडिसी कडून कर्ज मंजूर होऊनही राजकीय हेतु डोळ्यासमोर ठेऊन राज्य शासनाने घोडगंगाची कर्जाबाबत अडवणूक केली.हल्ली महाराष्ट्रात पैसे असतानाही काही कारखाण्यांना पैसे दिले जात नाहीत ही दुर्दैवी बाब आहे.सरकार आल्यानंतर शिरूरकरांच्या हक्काचा घोडगंगा कारखाना सुरू केला जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांनी येथे दिली.
यावेळी पवार यांनी यापूर्वी केलेल्या कर्ज माफीची माहिती देत महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहिरनाम्याचे विश्लेषण केले.चासकमान व घोड धरणाचे पाणी शिरूर तालुक्यात आणल्याने सध्या शिरूर तालुका हा ८५ टक्के बागायती झाला आहे.
एमआयडिसी उभी केल्याने डोंगराळ असलेल्या रांजणगाव परिसरात विविध कंपन्या सुरू झाल्या.पर्यायाने शेतकऱ्यांना दोन अधिकचे पैसे मिळाले तर युवकांना रोजगार मिळाला आहे.सुजाता व अशोक पवार ही वाहून घेणारी माणसं आहेत.त्यांच्यावर अनेक संकटे आलेली असतानाही ते माझ्या सोबत ठामपणे उभे राहिले.त्यामुळे त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे रहा.मोठ्या मताधिक्याने अशोक पवार यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन पवार यांनी केले.
उत्तम जानकर म्हणाले,पुढील उमेदवार हा बाळूमामाची यात्रा घडूउन मते मागत आहेत.बाळूमामा हे आमच्या हृदयात आहेत.मात्र यात्रा घडून पाच वर्षासाठी विकाऊ आमची जात नाही.राज्यात सत्तेसाठी अनेक पक्ष फोडले गेले.परंतु अशोक पवार यांनी गद्दारी न करता संघर्षाचा मार्ग निवडला.राज्यात जाती पातीत भांडणे लाऊन विष पेरण्याचे काम हे सरकार करत आहे.आगामी मंत्री मंडळात अशोक पवार मंत्री असणार आहेत.यामुळे भुलथापांना बळी न पडता त्यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
अशोक पवार म्हणाले, आमच्या कुटुंबावर अनेक संकटे आली मात्र आम्ही न डगमगता त्या संकटाना सामोरे जात पवार साहेबांसोबत आहोत.गद्दारीचा शिक्का हा मेल्याशिवाय पुसत नाही.त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार आहे.आपल्यावर संकटे येतात तेव्हा पवार साहेबच धाऊन येतात.अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात निधीची अडवणूक केल्याने विकास कामे रखडली. विरोधी उमेदवाराकडील सर्व लोक हे एमआयडिसी माफिया,सॅंड व लँड माफिया आहेत.तुम्ही त्यांना निवडुन देणार आहात का?सरकार आल्यानंतर शिरूर हवेलीतील दोन्ही साखर कारखाने सुरू करावेत तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गद्दारांना गाढा :- तरूणांना हक्काच्या रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मी औद्योगिक वसाहत शिरुर मध्ये आणली. या औद्योगिक वसाहतीमध्ये पक्षाच्या जोरावर अनेकांनी आपले बस्तान बसवले. पदे मिळवली. आणि हीच मलिदा गॅंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पाडायला एक झाली आहे. अशा गद्दारांना शिरुर करांनी गाडुन टाका, असे आवाहन ही शरद पवार यांनी केले.
